Ad will apear here
Next
तुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती

रहस्यमय कथा असलेले चित्रपट हा प्रत्येकाच्याच आवडीचा विषय असतो. इतर चित्रपटांच्या तुलनेत रहस्यमय चित्रपट खिळवून ठेवणारे आणि उत्सुकता वाढवणारे असतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाड’ या रहस्यमय चित्रपटाच्या बाबतीतही हे खरं आहे. या चित्रपटाबद्दलच्या या लेखापासून हर्षद सहस्रबुद्धे यांचं ‘रसास्वाद’ हे नवं पाक्षिक सदर ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर सुरू करत आहोत. साहित्य, चित्रपट, नाटक आणि अशा अनेकविध गोष्टींचा रसास्वाद असं त्या सदराचं स्वरूप असेल.
................
राही अनिल बर्वे दिग्दर्शित ‘तुंबाड’ हा नवा चित्रपट म्हणजे दृकश्राव्य माध्यमातली एक गूढकथा आहे. प्रत्येक कुटुंबाची स्वतःची अशी काही रहस्यं असतात. ती त्या कुटुंबापुरतीच मर्यादित राहतात. काळानुसार ती एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत जातात. नारायण धारप यांच्या कथा/कादंबरीवर आधारित असलेल्या ‘तुंबाड’मध्येही अशी काही रहस्ये आहेत, गूढ गोष्टी आहेत. या गोष्टी कथेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या कुटुंबातल्या प्रत्येकाला ती ज्ञात नाहीत. कुटुंबातली काहीच माणसं या गोष्टी जाणतात आणि स्वतःच्या फायद्याकरिता त्या गोष्टींचा उपयोग करून घेतात. 

तुंबाड हे एकाट गाव, तिथे रात्रंदिवस धो-धो कोसळत असणारा पाऊस, त्या गावात असणारा एक जुना वाडा आणि त्या वाड्याच्या पोटात दडलेलं एक जीवघेणं काळं रहस्य, हे या कथेचे प्रमुख घटक आहेत. १९१८ ते १९४७ अशा मोठ्या कालखंडात ही कथा घडते. उत्तम छायांकन, पार्श्वसंगीत, ध्वनी आरेखन आणि कला-दिग्दर्शनाच्या मजबूत अशा पायावर हा चित्रपट उत्तम वातावरणनिर्मिती करतो. त्या काळात नेतो. कथेत गुंतवून ठेवतो. परंतु मध्यंतरानंतर चित्रपटातला ‘सरप्राइज एलिमेंट’ किंचित कमी होतो. पुढचा प्रसंग किंवा शेवट नेमका काय असेल, याचा थेट अंदाज जरी आपण लावू शकत नसलो, तरी कथेच्या प्रवासाबद्दल वाटणारी उत्कंठा जराशी कमी होत जाते.

जुनाट वाडा आणि त्याच्याशी संबंधित असणारी गुप्तधनाची रहस्यं, हे कथासूत्र मराठी भाषकांना नवीन नाही; पण हे सगळं दृकश्राव्य माध्यमात पाहणं, ही निश्चितच वेगळी अनुभूती ठरते. एक-दोन कलाकार वगळता बाकी कलाकार फारसे माहितीचे नसणं आणि कथेच्या जातकुळीबद्दल फारसा अंदाज नसणं, असं सगळं असूनही ‘तुंबाड’ प्रेक्षकाला स्वतःबरोबर घेऊन जातो. मुसळधार कोसळणारा पाऊस, एकामागून एक घडणाऱ्या वेगवान घटना, त्यातलं वैचित्र्य या सगळ्याभोवती असणारं गूढतेचं वलय आणि या सर्वांत साजेशी वातावरणनिर्मिती करणारं प्रभावी कलादिग्दर्शन यामुळे ‘तुंबाड’ हा नेहमीच्या चित्रपटांपेक्षा वेगळा चित्रपट ठरतो. 

‘गूढकथा’ हा यापूर्वी फारसा हाताळला न गेलेला प्रकार दिग्दर्शक पदार्पणातच प्रभावीपणे हाताळतो. अशा प्रकारची कथेची कल्पना, चित्रपट करायचा आहे हे डोळ्यासमोर ठेवून करणंच मुळात एक आव्हान आहे. जुना काळ, त्या वेळच्या वस्तू, पात्रांच्या वेशभूषा, तत्कालीन पद्धती, बारीक-सारीक तपशील, इत्यादी गोष्टी बारकाव्यांसह सादर केल्या गेल्या आहेत. पात्रांच्या विशिष्ट लकबी, त्यांची देहबोली, संवादफेक, त्यांची स्वभाववैशिष्ट्यं या गोष्टींवरही विशेष मेहनत घेतली गेली आहे. तुंबाडचा सतत कोसळत असणारा झिम्माड पाऊस, त्यामागची देवांच्या शापाची आख्यायिका, तो वाडा आणि तिथे असणारं ‘हस्तर’चं अस्तित्व, या सगळ्या गोष्टी ‘मेक-बिलिव्ह’ लॉजिकचं उत्तम उदाहरण आहेत. यातले बरेच कलाकार नवोदित असले, तरीही त्यांनी आपली कामं चोख वठवली आहेत. प्रत्येक गूढकथेला असतं, तसं स्वतःचं असं वैशिष्ट्यपूर्ण लॉजिक तुंबाडच्या कथेलाही आहे. या कथेला स्वतःचे नियम आहेत. काही वेगळे आयाम आहेत. मिती आहेत. 

मध्यांतर येईपर्यंत चित्रपट उत्कंठा टिकवून ठेवतो. नंतर मात्र त्यातला उत्कंठा व भयाचा घटक कमी होतो. क्लायमॅक्स लॉजिकच्या दृष्टीने बराचसा निराश करतो. त्यामध्ये असणारी रंजकता कमी आहे. सुरुवातीच्या तीस मिनिटांनंतर ‘हॉरर एलिमेंट’ही कमी होत जातो. क्लायमॅक्समधे असणारा धक्का तितका प्रभाव पाडू शकत नाही. चित्रपटाचा पूर्वार्ध उत्तम जमला आहे. त्या मानाने उत्तरार्ध किंचित मंदावतो आणि शेवटाकडे येत असताना किंचित निराशा करतो. अशा चित्रपटांचा शेवट कसा असावा, याबद्दलच्या अपेक्षा प्रेक्षकानुसार बदलू शकतात. बऱ्याचशा प्रेक्षकांना, एक निश्चित असा शेवट आवडतो. ओपन एंड किंवा अर्धवट शेवट असणारे सिनेमे बऱ्याच जणांना निराश करतात. पूर्ण समाधान देत नाहीत. तुंबाडला निश्चित असा शेवट आहे. कथेच्या तत्त्वानुसार हा शेवट यथायोग्यच आहे. तरीही मला स्वतःला, अशा निश्चित शेवटाऐवजी या कथेचा शेवट अनिश्चित वळणावर आणून सोडून द्यायला हवा होता, असं वाटलं. 

अनिश्चित प्रकारातल्या शेवटामध्ये प्रेक्षकाला त्याच्या मर्जीनुसार विचार करण्याचं स्वातंत्र्य राहतं आणि अशा गूढकथांसाठी ते गरजेचं ठरतं. जेव्हा एखाद्या घराण्याला पिढ्यान् पिढ्या एखादा शाप असतो, तेव्हा या शापाचं उच्चाटन इतक्या निश्चित अशा शेवटानं होईल हे जरासं न-पटणारं आहे. उत्तम कथा, त्याला साजेशी वातावरणनिर्मिती, प्रमुख कलाकारांचे उत्तम अभिनय, कथेत असणाऱ्या गुंतागुंतीचा परिणाम कमी होऊ न देता सुटसुटीतपणे लिहिलेली पटकथा, देखणं छायांकन, प्रभावी पार्श्वसंगीत, या सर्वांना साजेसं दिग्दर्शन अशा सगळ्याच बाबतीत चांगला असणारा ‘तुंबाड’ क्लायमॅक्स आणि शेवट अशा दोन्ही ठिकाणी जरासा गडगडतो. जर तुम्ही गूढकथांचे चाहते असाल आणि सिनेमा हे माध्यम किती ताकदीनं वापरता येऊ शकतं, हे जाणून घ्यायचं असेल, तर तुंबाड एकदा पाहायला हरकत नाही. ‘तुंबाड’ हा निव्वळ चित्रपट नाही. ती भयाची दृकश्राव्य अनुभूती आहे. राही अनिल बर्वे हे नव्या दिग्दर्शकांच्या यादीमधलं आश्वासक नाव आहे. ‘तुंबाड’नंतर तो काय करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होईल. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.) 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZQEBT
 I woul'd like to follow.8
 खुपच सुंदर विश्लेषण .4
 हर्षद सर,नेहमीप्रमाणेच सुरेख लेख,तुम्ही लिहिलेल्या पोस्ट्स मी fb वर कायम वाचत आले आहे,इथेही नक्कीच वाचेन3
Girish Lovekar नेहमीप्रमाणे सुरेख. Would love to read further articles.3
 Great write-up4
 सुंदर परीक्षण....3
 पूर्णिमाजी, नेहा, गिरीशजी,ध्रुवकाका, ज्ञानेश्वर आपणा सर्वांचे खूप खूप आभार.
ऐश्वर्या जोशी आपले मन:पूर्वक आभार.2
Similar Posts
विहीर : जाणीव-नेणिवेतल्या संवेदनांचा संपृक्त अर्क उमेश कुलकर्णी यांचं अतिशय प्रभावी असं दिग्दर्शन, गिरीश कुलकर्णी, सती भावे यांची पटकथा, गिरीश कुलकर्णी यांनी लिहिलेले उत्कृष्ट संवाद, सर्वच कलाकारांचा दर्जेदार अभिनय, सुधीर पलसानेंचं देखणं छायाचित्रण आणि मंगेश धाकडे यांचं अर्थपूर्ण संगीत अशा सर्व घटकांमुळे आणि अत्यंत अर्थपूर्ण अशा आशयामुळे, ‘विहीर’ हा एक महत्त्वपूर्ण मराठी चित्रपट म्हणून गणला जातो
अस्तु : अंतर्मुख करणारी अनुभूती सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकरांच्या सिनेमात, विषयाची गंभीर हाताळणी कायमच पाहायला मिळते. समांतर सिनेमासारख्या प्रकारात तर ती फारच महत्त्वाची असते. समस्या, समस्याग्रस्त व्यक्ती (मध्यवर्ती पात्र), इतर सहायक पात्रं, समस्येचं गांभीर्य, त्यामुळे होणारे परिणाम, पात्रांच्या भावविश्वात आणि बाह्य विश्वात होणारी
जंगल : अंगावर काटा आणणारा थरार सुशांत सिंगचं दुर्गा सिंग म्हणून केलेलं मोअर दॅन परफेक्ट कास्टिंग, उर्मिला मातोंडकरचा उत्कृष्ट अभिनय, अतिशय वेगळा विषय, तो जिवंतपणे मांडणारी जयदीप साहनीची पटकथा आणि या सगळ्याला साजेसं असणारं राम गोपाल वर्माचं दिग्दर्शन हे ‘जंगल’ सिनेमाचं वैशिष्ट्य. १८ वर्षं होऊनही आजही ताजातवाना वाटणारा हा चित्रपट राम
मायाबाजार प्रेम ही आदिम भावनांपैकी सर्वांत महत्त्वाची भावना. साहित्य, चित्र, संगीत, शिल्प, नाटक, चित्रपट इत्यादी कोणत्याही स्वरूपातला कलाविष्कार सादर करताना, प्रेम हा विषय कायमच अग्रणी राहिला आहे. या सुखद, हुरहुर लावणाऱ्या भावनेचा आपण प्रत्येकाने कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अनुभव घेतलेला असतो. सिनेमा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language